पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला १५ जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.
बाबूपेठ भागात १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९.३० वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार माध्यमांमध्येही यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन करीत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या घटनेत त्या परिसरात काही नुकसान झाले असल्यास त्याची माहिती देखील कळवावी व योग्य ती उपाय योजना करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.