नवी दिल्ली:- वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. देशातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहे. त्यात भगतसिंह कोश्यारी यांचा समावेश आहे.
आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.
कोण आहेत रमेश बैस
रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.