नागपूर:- बाजारभावापेक्षा अधिक किमतीत कापूस खरेदीचे आमिष दाखवून तीन कथित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तब्बल ५० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
धारणी येथील मदरसा कॉम्प्लेक्स येथे अब्दूल अझिज नामक व्यापाऱ्याचे दुकान आहे. या दुकानात बसून २० ते २५ वयोगटातील पाच युवकांनी कापूस खरेदीचा व्यवसाय करण्याचे भासवून कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली. मोहम्मद मोहसिन (२०), अर्जून सानू पटोरकर (२५), मोईन खान वसीम खान (२२) अशी या आरोपींची नावे आहेत.
सध्या बाजारात कापसाला ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. पण, आम्ही तुमचा कापूस ९ हजार ते १० हजार रुपये दराने खरेदी करू, असे आमिष दाखवून आरोपींनी धारणी तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली. लगतच्या अनेक गावांमध्ये ते गेले आणि शेतकऱ्यांना याच ठिकाणी कापूस विक्री करण्यास सांगितले.
सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांनी आरोपींना ५०० क्विंटलच्या वर कापूस विकला. हा कापूस मोठ्या व्यापाऱ्यांना विकून तुमचे पैसे देऊ, असे आश्वासन आरोपींनी शेतकऱ्यांना दिले. पण, बरेच दिवस उलटूनही आरोपींनी रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांना संशय आला. अखेरीस रामलाल पारक्या कासदेकर (५९, रा. बारू, धारणी) यांनी धारणी पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार नोंदवली. कापसाला जादा भाव मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे ५० शेतकऱ्यांची आरोपींनी फसवणूक केल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत