समाजमाध्यमावर तरुणींशी मैत्रीचे आमिष, ज्येष्ठाला एक कोटींचा गंडा #chandrapur #pune

Bhairav Diwase


पुणे:- समाजमाध्यमावर तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला एक कोटी दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रजत सिन्हा, नेहा शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ७८ ज्येष्ठ वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ते एकटेच राहत होते.

गेल्या वर्षी नेहा शर्माने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. के. बी. डेटिंग कंपनीने डेटिंग ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्रीची संधी मिळणार आहे, असे आमिष आरोपी नेहा शर्माने ज्येष्ठ नागरिकाला दाखविले होते. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकाकडून शर्माने काही पैसे ऑनलाइन पद्धतीने उकळले. त्यानंतर शर्माने त्यांना जाळ्यात ओढले.

विवाह करण्यास इच्छुक असल्याचे आमिष शर्माने ज्येष्ठ नागरिकास दाखविले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन वेळोवेळी पैसे उकळले. ज्येष्ठ नागरिकाला पैसे भरण्यासाठी शर्मा आणि तिचा साथीदार रजत सिन्हा यांनी धमकावले. बदनामीची धमकी देऊन आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवळी एक कोटी दोन लाख १२ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक संगीता माळी तपास करत आहेत.