Top News

.......आणि, 'पालक'मंत्री झाले 'बालक' #chandrapur



चंद्रपूर:- माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. तो आपल्या भावनांना केव्हा वाट मोकळी करून देईल सांगता येत नाही. पण यासाठी आवश्यक असते, वेळ व संधी. अशी संधी मिळाली की माणूस व्यक्त होतो. असेच काही घडले चंद्रपूर-गोंदियाचे पालकमंत्री व राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत. औचित्य होते, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा... या गीताचे शिव जयंतीच्या पर्वावर 19 फेब्रुवारीला 'राज्यगीत' म्हणून लोकार्पण व शुभारंभाचे. या सोहळ्यात चिमुकल्यांना वाद्य वाजवतांना बघून ना.मुनगंटीवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत, स्वतः वाद्य वाजविण्यास सुरवात केली, आणि सारा आसमंत 'जय भवानी,जय शिवाजी'च्या जयघोषाने निनादला आणि 'पालक' मंत्री झाले 'बालक' अशी चर्चा सुरू झाली.



देशातील अनेक राज्याचे राज्यगीत असतांना महाराष्ट्राचे राज्यगीत असावे, अशी मागणी मागील 6 दशकापासून केली जात होती. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यावर 30 जानेवारी 2023 ला 'शिंदे-फडणवीस सरकारने सांस्कृतिक कार्यमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशींची दखल घेत कविवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायिलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून 2 चारणांसह 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला 'राज्यगीत'म्हणून मान्यता दिली. त्या गीताचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे 19 फेब्रुवारीला औचित्य साधून चंद्रपूर येथील शिवस्मारकावर लोकार्पण करण्यात आले. आता हे गीत प्रत्येक शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीतानंतर म्हणणे क्रमप्राप्त झाले आहे. नियोजित कार्यक्रम संपल्यावर नामदार मुनगंटीवार यांनी तेथे निनादत असलेल्या ढोल ताश्याची पाहणी केली. यावेळी काही बालकांना वाद्य वाजवितांना बघून त्यांनी मुख्य वादकाची 'मोठी डफली' वाजविणे सुरू केल्याने हा विषय, महानगरातच नाही तर सोशल मीडियावर चर्चेचा ठरला. यावेळी भाजपा नेते डॉ मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, राहुल पावडे, राखी कांचर्लावार व विशाल निंबाळकर, मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांची उपस्थिती होती.

प्रत्येक जिल्ह्यात होणार महानाट्य 'जाणता राजा'चे प्रयोग

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचे आचरण भावी पिढीला माहित होण्यासाठी पुढील वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात 'जाणता राजा' या महानाट्याचे प्रयोग सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे निःशुल्क सुरू करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असलेल्या चित्रपटांचे सादरीकरणसुध्दा जिल्ह्याजिल्ह्यात करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलन, शिवगीत स्पर्धेचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे ना.मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

राज्यभरात साजरे होणार छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे 350 वे वर्ष


छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे 350 वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे.चांदा पासून बांदा पर्यंत,भामरागड पासून रायगड पर्यंत हे आयोजन असेल.एवढेच नाही तर,आपल्यासाठी प्राणप्रिय व कोहीनुर हि-यापेक्षाही जास्त महत्वाची असलेली शिवाजी महाराजांची 'जगदंबा' तलवार आणि वाघनखे इंग्लडवरून भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे सहकार्य घेण्यात येणार आहे.अशी माहिती ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने