Top News

आयुध निर्माणी वसाहतीत महिलेला गंभीर जखमी करणारा बिबट जेरबंद #chandrapur #bhadrawati


भद्रावती:- दहा दिवसांपूर्वी चांदा आयुध निर्माणी वसाहतीतील एका महिलेला गंभीर जखमी करणारा बिबट गुरूवारी पहाटे जेरबंद झाला असून वसाहतीमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार आयुध निर्माणी वसाहत ही ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या वसाहतीत नेहमीच वाघ, अस्वल, बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे नेहमीच वसाहतीमधील नागरिकांना दहशतीखाली जगावे लागते. दि.२० फेब्रुवारी रोजी सायंकाळी फिरायला जाणाऱ्या विमलादेवी टिकाराम या ४२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. यापूर्वी लगतच्या पिपरबोडी परिसरात पाळीव प्राणी व नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले. त्यामुळे वनविभागाने पिपरबोडीसह आयुध निर्माणी वसाहतीत अनेक ठिकाणी पिंजरे लावले. परंतु हे सर्व बिबट पिंजऱ्यांना हुलकावणी देत होते. तथापि दि.१८ फेब्रुवारी रोजी पहाटे एक बिबट पिपरबोडी परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात कैद झाला होता. नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु पुन्हा दोन दिवसांनी विमलादेवी या महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्याने नागरिकां पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले. आज जेरबंद झालेला बिबट हा विमलादेवी यांच्यावर हल्ला करणारा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सदर बिबट्याला चंद्रपूरच्या सीटीसी केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. या बिबट्याचे वय दीड वर्षे असून मादी प्रकारचा आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही सहायक वनसंरक्षक आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी.शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी केली. त्यांना सार्ड संस्थेचे सदस्य श्रीपाद बाकरे, प्रणय पतरंगे, अनुप येरणे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने