एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत जि. प. प्राथ. शाळा चेक आष्ट्याला सुशय
चंद्रपूर:- डिसेंबर 2022 रोजी इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना (एनएमएमएस) या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागून नुकतीच शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थांची निवड यादी जाहीर करण्यात आली . या शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा उंच भरारी घेतली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय जि. प. प्राथ. शाळा चेक आष्टा शाळेतील विद्यार्थांनी पटकावले आहे. कु. वेदिका साईनाथ पावडे ही जिल्हास्तरीय निवड यादीत पहिली आली आहे. तर नयन बंडू पेंदोर यांने द्वितीय व वेदांत सुरेश मडावी यांने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे या परिक्षेला इयत्ता आठवीतील अकरा विद्यार्थी बसले होते आणि त्यातील दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.
आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू नये, म्हणून राष्ट्रीय स्तरावर ही परिक्षा घेवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे बारावीपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थांना दरवर्षी बारा हजार रुपये असे चार वर्षांकरिता एकूण 48,000 रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे चेक आष्टा गावात खूप कौतुक केले जात आहे.
या यशाचे कारण विद्यार्थ्यांना विचारले असता सांगितले की , शाळेत सतिश शिंगाडे सर एनएमएमएस परिक्षेची पेपर सरावासह संपूर्ण तयारी करून घेतात. दरवर्षी अधिकचे शिष्यवृत्ती वर्ग घेवून त्यांना मार्गदर्शन करणारे सतिश शिंगाडे सर यांचे सुद्धा अभिनंदन केले जात आहे.
शाळेचे मुख्याध्यापक अरूण यामावार, विनोद पोगुलवार, कु. लाकडे मॅडम, सरपंच कांता मडावी, उपसरपंच जगन येलके, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य जयंत पिंपळशेंडे, संतोष बोंडे अध्यक्ष शा. व्य. स. चेक आष्टा यांनी सर्व विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले.
2018 पासून या शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीत समाविष्ट होत आहेत. सध्या 15 विद्यार्थी शिष्यवृत्ती घेत असून यावर्षीपासून यामध्ये दहा विद्यार्थी अधिकचे जोडले जातील.