अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा #chandrapur

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर:- अप्रमाणीत कृषी निविष्ठा (बी - बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्याविरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी 5 ते 10 वर्ष लागत असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे सदर खटले त्वरित निकाली काढण्यासाठी शीघ्र कृषी न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राज्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात मूलभूत कृषी निविष्ठांची शेतकऱ्यांना आवश्यकता असते. विविध बी - बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके उत्पादक व विपणन कंपनीच्या माध्यमातून परवानाधारक कृषी केंद्रामधून कृषी निविष्ठांची विक्री होत असते. सदर कृषी निविष्ठा बियाणे कायदा 1966 व अनुषंगिक कायदे व नियम, रासायनिक खत कायदा 1985 व कीटकनाशक कायदा 1968 या अंतर्गत सनियंत्रित केल्या जातात. राज्यातील गुणनियंत्रक निरीक्षकांच्या वतीने बी - बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांचे नमुने परवाना विक्री केंद्रातून तसेच उत्पादक कंपनीच्या फॅक्टरी युनिट मधून घेण्यात येतात. राज्यातील तपासणी प्रयोगशाळेत सादर केल्यानंतर सदर नमुने अप्रमाणित आढळल्यास वरील कायद्यान्वये संबंधित कंपनी व विक्रेत्याविरुद्ध न्यायालयीन खटला त्या क्षेत्रातील न्यायालयात दाखल करण्यात येतो.

सदर खटल्याचा निकाल येण्यास 5 ते 10 वर्षे लागत असल्याने शेतकऱ्यांना विहित मुदतीत न्याय मिळत नाही. याकरिता सदर न्यायालयीन प्रकरणांसाठी शीघ्र कृषी न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन केले तर शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे अशा प्रकरणां साथी राज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या