रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील:- ना. मुनगंटीवार #Rajura #chandrapur

रामपूर (ता. राजुरा) येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवसाला प्रमुख उपस्थिती


राजुरा:- गेल्‍या अनेक वर्षांपासून रामपूर गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्‍तीनिशी रामपूर वासियांच्‍या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

रामपूर तालुका राजुरा येथील ग्राम पंचायत स्‍थापना दिवस व पाणी पुरवठा जलशुध्‍दीकरण केंद्राच्‍या भूमीपूजन तसेच विविध विकासकामांच्‍या लोकार्पण सोहळा प्रसंगी ना. मुनगंटीवारांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, अॅड. संजय धोटे, रामपूर ग्राम पंचायतच्‍या सरपंच वंदना गौरकार, उपसरपंच सुनिता उरकुडे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गौरकार, भाजपा जिल्‍हा महामंत्री नामदेव डाहूले, भाजयुमो अध्‍यक्ष आशिष देवतळे, मजिप्राचे कार्यकारी अभियंता श्री. उध्‍दरवार, श्रीकृष्‍ण गोरे, रामपूरचे ग्रामविकास अधिकारी श्री. विरूटकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत रामपूर येथे १३ कोटी ६७ लाख रूपये किंमतीची पाणी पुरवठा योजना व पाण्‍याची टाकी तसेच जलशुध्‍दीकरण केंद्राचे भुमीपूजन संपन्‍न झाले. त्‍याचप्रमाणे गावात केलेल्‍या विविध कामांचे लोकार्पण तथा ग्राम पंचायतच्‍या विकासाकरिता मदत करणा-या आजी-माजी लोकप्रतिनिधींचा यावेळी सत्‍कार करण्‍यात आला.


यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज बुध्‍द पोर्णिमा आहे. आजच्‍या दिवशी आकाशात सगळयात जास्‍त उजेड असतो, अश्‍यावेळी रामपूरचा वर्धापन दिन आहे हा अतिशय उत्‍तम योग आहे. सरपंच बोलताना आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, रामपूरला कोणी मंत्री पहिल्‍यांदा आले आहेत हे ऐकुन मला इथे येण्‍याचा अतिशय आनंद आहे. याठिकाणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मागणी केल्‍यानुसार महिलांच्‍या बचतगटासाठी एक सभागृह माविमंतर्फे मंजूर करण्‍यात आले होते, परंतु तांत्रीक अडचणींमुळे हे काम पुढे जावू शकले नाही. आज मी आपणा सर्वांना हे सभागृह जिल्‍हा विकास निधीतील नाविन्‍यपूर्ण योजनेतुन मंजूर करून लवकरात लवकर तयार करण्‍याची घोषणा करतो. तसेच रामपूर गावातील अंतर्गत रस्‍त्‍यासाठी सरपंचांनी मागीतल्‍यानुसार २० लाख रूपये मंजूर करण्‍याची सुध्‍दा घोषणा करतो. त्‍याचप्रमाणे राजुरा-आदिलाबाद या राष्‍ट्रीय महामार्गावरील रामपूरजवळील भवानी नाल्‍यामध्‍ये पुराचे पाणी निघुन जाण्‍यासाठी एका पुलाची मागणी झाली आहे हा पुल सुध्‍दा लवकरात लवकर पूर्ण करण्‍याचे निर्देश मी अधिका-यांना देणार आहे. ज्‍यामुळे महाविद्यालयामध्‍ये पावसाळयात जाताना होणारा त्रास वाचेल.

२०१४ ते २०१९ या काळात महाराष्‍ट्रात युती सरकार होते. त्‍या काळात संपूर्ण महाराष्‍ट्रात व चंद्रपूर जिल्‍हयातही अनेक विकासाची कामे झाली, परंतु २०१९ ते २०२२ या अडीच वर्षात महाराष्‍ट्रात असलेल्‍या सरकारने विकासाची सर्व कामे ठप्‍प केली. त्‍यामुळे मुर्ती विमानतळ, राष्‍ट्रीय महामार्ग या व इतर अनेक कामांमध्‍ये खोळंबा निर्माण झाला. आता आमचे सरकार अतिशय वेगाने काम करून सर्व प्रकल्‍प अतिशय जलदगतीने पूर्ण करण्‍याचा संकल्‍प आम्‍ही केला आहे. रामपूर ही ग्राम पंचायत गेल्‍या काही वर्षात झपाटयाने वाढली आहे. त्‍यामुळे या गावाचा समावेश राजुरा नगर परिषद हद्दीत करावा अशी मागणी आली आहे. याचा अभ्‍यास करून निर्णय घेण्‍यात येईल.

याप्रसंगी माजी आमदार वामनराव चटप, संजय धोटे, सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे या सर्वांच्‍या या ग्राम पंचायतीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केल्‍याबद्दल त्‍यांचा ग्राम पंचायतीतर्फे सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी या सर्वांचे यथोचित मार्गदर्शन सुध्‍दा झाले. याप्रसंगी ग्राम पंचायत तथा अनेक सामाजिक संघटनातर्फे ना. मुनगंटीवार यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत