गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी दत्ताजींनी आपले आयुष्य वाहिले:- भपेंद्र शहाणे #chandrapur #abvpchandrapur

Bhairav Diwase

नागपुरात जन्मशताब्दी वर्षाच्या उदघाटनाचा मोठा कार्यक्रम होणार
चंद्रपूर:- अभाविपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दत्ताजी डिडोळकर यांनी घर मोकळे करून दिले. जो येईल, मग तो कुठल्याही जाती, धर्माचा, पंथाचा असो त्याला आपल्या घरी ठेवून त्याच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मतद करणे हा जणू दत्ताजींचा धर्म होता.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी दत्ताजी डिडोळकर यांनी आपले आयुष्य वाहिले असल्याचे प्रतिपादन दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीचे भपेंद्र शहाणे यांनी येथे बोलताना केले. दरम्यान येत्या काळात नागपुरात जन्मशताब्दी वर्षाच्या उदघाटनाचा मोठा कार्यक्रम होणार आहे.

चंद्रपूर येथील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात 16 जून रोजी सायंकाळी अभाविपच्या पूर्व कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबा भागडे, अभाविपचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष पंकज काकडे प्रभृती उपस्थित होते.

दत्ताजींच्या मार्गदर्शनात काम करण्याचा मोठा अनुभव शहाणे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे दत्ताजी कठीण प्रसंगीसुध्दा कसे संयमित वागायचे, याचे चित्रण त्यांनी सर्वांसमोर उभे केले. विद्यापीठाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या गुणांच्या अगदी शुल्लक तक्रारी आम्ही नेत असतानाही दत्ताजी सारे शांतपणे ऐकूण घ्यायचे आणि विषय मोठा असो की लहान तो सोडवण्याचा प्रयत्न करायचे. विद्यार्थी निराश व्हायला नको हे ते नेहमी जपायचे, असेही शहाणे म्हणाले. ''सब समाज को लिये साथ आगे है बढते जाना...'' हे गीत अक्षरश: दत्ताजी जगले, या शब्दात भपेंद्र शहाणे यांनी त्यांच्या आढवणींना उजाळा दिला.

दरम्यान समाजात अनेक होतकरू विद्यार्थी आहेत. मात्र, त्यांच्या परिवारातील आर्थिक अडचणीमुळे पुढे शिकू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे, शिवाय त्यांच्या अन्य शैक्षणिक अडचणी सोडवण्याचे काम गेल्या काही वर्षात महाराष्ट्र स्तरावर सूरू आहे. विद्यार्थी सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून दत्ताजी डिडोळकर विद्यार्थी विकास निधीद्वारा विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असून, चंद्रपुरातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनीलाही तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मदत करण्यात आल्याची माहिती शहाणे यांनी यावेळी दिली.

डॉ. चंद्रशेखर भुसारी यांनी, दत्ताजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोणकोणते कार्यक्रम होतील, याची माहिती विशद केली. येत्या काळात नागपुरात जन्मशताब्दी वर्षाच्या उदघाटनाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातून अभाविपचे पूर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानिमित्त जन्मशताब्दी समारोहाची जिल्हा समिती तयार करणे, विविध कार्यक्रमांची रचना करणे, जिल्हास्थानी एक मोठा कार्यक्रम घेणे आदी योजना यावेळी तयार करण्यात आली.

संचालन पियुष बनकर यांनी, तर प्रास्ताविक पंकज काकडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अभाविपचे पूर्व कार्यकर्ते, विद्यमान कार्यकर्ते, गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य आदी उपस्थित होते.