गोंडपिपरी:- गोंडपीपरी तालुक्यातील अडेगावातील शेतकरी अखिल नागपुरे यांच्या घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, कागदपत्रांसह लाखो रुपये जळून खाक झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Four lakhs of cash was burnt in a fire at a farmer's house)
शेतीसाठी अखिल नागापुरे यांनी पीक कर्ज घेतलं होतं. घरातील मका विकला होता. बचत गटातून काही रक्कम मिळाली होती. असे एकूण चार लाख रुपये घरात होते. आगीत ही संपूर्ण रोख रक्कम जळून खाक झाली. घरातील सोने, महत्त्वाची कागदपत्रे, कपडे, गहू, तांदूळ, तुरीची डाळ, मिरची, सोफा जळून खाक झाले.
रोख रकमेखेरीज लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. एकिकडे शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. शेती उभी करायला पैशाची जमवाजमव ते करीत आहेत. तर दुसरीकडे नागपुरे यांचे शेतीसाठी आणलेले सर्व पैसे जळून गेले आहेत. त्यामुळे आता शेती कशी उभी करायची या विवंचनेत नागपुरे पडले आहेत.