Top News

चंद्रपूरच्या पुष्पा पोडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान #chandrapur #NewDelhi

नवी दिल्ली/चंद्रपूर:- आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. यात चंद्रपूरच्या पुष्पा श्रावण पोडे यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. (Pushpa Pode of Chandrapur was presented with the Florence Nightingale Award by the President)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंग बघेल, विभागाचे सचिव राजेश भुषण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्ग, आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते.

वर्ष 2023 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे यांचा समावेश आहे.

पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून कार्यरत आहेत. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी पाच वर्ष सेवा दिली असून त्यांच्या कामाप्रती अंत्यत वचनबद्ध व मेहनती परिचारिका म्हणून त्या लोकप्रिय आहेत. श्रीमती पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे. श्रीमती पोडे यांनी दिलेल्या आरोग्य सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. पदक आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने