बँकेची एक कोटीने फसवणूक करणारा जाळ्यात #chandrapur #saoli #mul #Bankfraud

Bhairav Diwase

अडीच वर्षांपासून होता फरार

चंद्रपूर:- बनावट कागदपत्रे तयार करून मूल येथील श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेतून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी फरार आरोपीला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. राजेश वसंतराव राईंचवार (५५) रा. सावली असे आरोपीचे नाव आहे. (1 Crore bank fraud in the net)

श्री कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या बॅंक व्यवस्थापकांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार, जमानतदार राजेश वसंत राईंचवार, मूल्यांकनकर्ता सचिन चिंतावार यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन बॅंकेची एक कोटीने फसवणूक केल्याची तक्रार सावली पोलिसात केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. न्यायालयांनी कर्जदार सरिता राजेश राईंचवार व मूल्याकनकर्ता यांना जामीन मंजूर केला होता. परंतु, अडीच वर्षांपासून मुख्य आरोपी राजेश राईंचवार फरार होते.

दरम्यान, २४ मे रोजी राजेश राईंचवार हे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असल्याची माहिती सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.