आरटीओ कार्यालयाला आग, संगणकांसह कागदपत्राची राख #chandrapur #wardha #fire #firenews

Bhairav Diwase


वर्धा:- वर्धा येथील प्रशासकीय भवनातील पहिल्या माळ्यावर असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाला अचानक आग लागल्याने संगणक संचासह कागदपत्रांची राख झाली. ही आग सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान उघडकीस आल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी एकच धावपळ उडाली. या आगीने पुन्हा एकदा शासकीय कार्यालयातील फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यापासून तर वरच्या तीन माळ्यावर एकूण १२ ते १३ शासकीय कार्यालय आहे. रविवार असल्यामुळे सर्वच कार्यालय बंद होते. सायंकाळच्या सुमारास पहिल्या माळ्यावरील आरटीओच्या कार्यालयातून धूर बाहेर निघताना दिसला.

काही वेळातच खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर येवू लागले. याची माहिती प्रशासनासह नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे मुख्याधिकारी राजेश भगत अग्निशमन दलासह दाखल झाले. दोन अग्निशमन बंबाने पाण्याचा मारा करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी आणि आरटीओ विभागाचे वाहन निरीक्षक विशाल मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या इमारतीचे फायर ऑडिट झाले नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी आरटीओ विभागातील आग विझविण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागली.