राष्ट्रवादीला दणका देत ओबीसी नेते डाॅ. जिवतोडे जाणार भाजपमध्ये #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- ओबीसींच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. ओबीसी मंत्रालय स्थापन झाल्यापासून आजवर कधी नव्हे ते ३२ जीआर ओबीसींच्या हिताचे पारित करण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींना तारणहार ठरणारा पक्ष असल्याने या पक्षात प्रवेश घेत असल्याचे ओबीसी नेते प्राचार्य अशोक जिवतोडे (OBC Leader Principal Ashok Jivtode) यांनी सांगितले. (OBC leader Dr. giving a blow to NCP. Lives will be lost in BJP)

कोठे होणार पक्ष प्रवेश?

जनता महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जिवतोडे बोलत होते. येत्या रविवारी (ता. २५ जून) जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३.३० वाजता विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशाचा सोहळा होणार आहे.
अवघ्या दोनच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार

विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी जुलै २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. या सोहळ्याला प्रांताध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम पार पडला होता. अवघ्या दोनच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ते भाजपमध्ये जाणार आहेत.

कोण आहेत प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे?

डॉ. जिवतोडे ३५ वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. १९६७ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून त्यांचे वडील दिवंगत श्रीहरी जिवतोडे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बंधू दिवंगत संजय जिवतोडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाशी जुळले होते. ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात १८ डिसेंबर २०१८ रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यात डॉ. जिवतोडे यांनी इतर ओबीसी नेत्यांसोबत मोर्चाचे नेतृत्व केले होते.
पक्ष प्रवेश सोहळ्याला कोण राहणार उपस्थित?

पक्ष प्रवेश सोहळ्याला देवेंद्र फडणविस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री शोभा फडणविस, आमदार बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री परिणय फुके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, सुदर्शन निमकर, संजय धोटे, भाजपचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित राहणार आहेत.
काय म्हणाले प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे?

आमची आजवरची लढाई ही ओबीसींच्या हितासाठी राहिलेली आहे. यापुढेही ओबीसींच्या हितासाठी झटणार आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. येथे राहून हा लढा अधिक परिणामकारक रीतीने पुढे नेता येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे डॉ. जिवतोडे माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)