प्रकाश देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्याच्या कारवाईला स्थगिती #chandrapur


चंद्रपूर:- कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी करून विजयानंतर भाजप जिल्हाध्यक्षांसोबत आनंदोत्सव साजरा केल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून तत्काळ कार्यमुक्त केले होते. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव वेणुगोपाल यांनी या कार्यमुक्तीच्या कारवाईला पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. (Postponement of the removal of Prakash Devtale from the post of District President)

एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासोबत हातमिळवणी करून स्वतंत्र पॅनल उभे केले होते. या पॅनलचा निवडणुकीत विजय झाला. निवडणूक निकालानंतर भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एकत्र आनंदोत्सव साजरा करीत गुलाल उधळीत ढोलताशाच्या तालावर नृत्य केले होते. या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पक्षविरोधी कार्यवाही केल्याचा ठपका ठेवत देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केल्याचा आदेश ३ मे २०२३ रोजी दिला होता. आता एक महिन्यानंतर या कारवाईला अ. भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव वेणुगोपाल यांनी स्थगिती दिली आहे.

अशा प्रकरणात राज्याच्या शिस्तभंग कमिटीकडे रीतसर तक्रार केल्यानंतर बाजू मांडण्याची संधी दिली जाते; परंतु प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचा सूर काँग्रेसच्या एका गटात उमटला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या