रेल्वे अधिकाऱ्यांच्या दडपशाही कार्यवाही विरोधात नागरीक धडकले तहसीलवर #chandrapur #ballarpur

बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील गणपती वॉर्ड, शांतीनगर, साईबाबा वॉर्ड व शिवाजी वार्डामध्ये जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रेल्वेच्या परिसरात अनेक नागरिक घरे बांधून राहत आहे. यामध्ये काही घरे रेल्वेच्या जागेवर आहे. तर काही नजुलच्या जागेवर आहे.

एक महिन्यापूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून गणपती वार्डात जागेची मोजणी केली व 7 जुलैला अनेकांना नोटीस पाठवण्यात आले. ही नोटीस रेल्वे अतिक्रमण असणाऱ्या घरांना तसेच नजूलच्या घरांना व ज्या नागरिकांकडे घर पट्टे आहेत अशा नागरिकांना सुद्धा नोटीस देण्यात आली. नजुल च्या व पट्ट्याच्या जमिनीवर सुद्धा रेल्वेने आपला अधिकार दाखविल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यातच नागरिकांनी आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकारी अरेरावी करत मुजोरीने उत्तर देतात. त्यामुळे स्थानिक नागरिक व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यावर संबंधित नागरिकांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांची भेट घेतली असता आशिष देवतळे यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली व या संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली असता भाऊंनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता रेल्वे अधिकाऱ्यांना चुकीची कारवाई करू नये. तसेच रेल्वे प्रशासनाने पहिले भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जॉईंड सर्वे करावे, नंतरच पुढची प्रक्रिया करावी असे निर्देश दिले. त्यानंतर सुधीर भाऊंच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील रेल्वेच्या विषयाशी संबंधित नागरिकांच्या उपस्थितीत बल्लारपूरचे तहसीलदार श्रीमती जगताप मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री सौरभ मेनकुदळे तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी व गणपती वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत