Top News

चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पहिला हक्क #chandrapur #loksabha #Congress

जिल्हाध्यक्ष धोटे म्हणाले....

चंद्रपूर:- एकीकडे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमध्ये कुठलीच गटबाजी नाही असे सांगतानाच, आपल्या अनेक वक्तव्यांतून गटबाजीचे स्पष्ट संकेत काँग्रसचे नुतन जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे यांनी येथे दिले.

येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार हा केवळ आणि केवळ चंद्रपूर लोकसभा मतदार संघातीलच हवा, असे अचंबित करणारे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ, येत्या लोकसभेची उमदेवारी पक्षातील एका दिग्गज नेत्याला देऊ नये जे जिल्ह्यातले तर आहेत, मात्र चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील विधानसभेचे नेतृत्व करीत नाहीत, असाच होता. आ. विजय वडेट्टीवार हे ज्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करतात ते क्षेत्र चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येत नाही. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात येते, हे येथे उल्लेखनीय!

आपल्या परखड विधानांसाठी ओळखले जाणारे आ. सुभाष धोटे यांनी, लोकसभेची उमदेवारी नैसर्गिक न्यायाने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी तथा आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिली पाहिजे. पण मीसुध्दा उमेदवार होऊ शकतो. तसेच शिवाजीराव मोघे हेही उमदेवारी मागू शकतात. मात्र, लोकसभेची उमदेवारी ही चंद्रपूर लोकसभा मतदार संघात रहावी, असे मत त्यांनी रविवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर महानगराचे अध्यक्ष रामू तिवारी, सुभाष गौर, दिनेश चोखारे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आ. सुभाष धोटे यांना अखेर जिल्हाध्यक्ष करण्यात आले. परंतु, आपल्याला जिल्हाध्यक्ष करू नये म्हणून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि त्यांचे काही सहकारी दिल्लीवारी करीत होते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आता मात्र मी जिल्हाध्यक्ष झालो आहे. यापुढे पक्षातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. तसे केल्याचे आढळल्यास त्याची दखल घेऊन तशी तक्रार प्रदेश कार्यालयात केली जाईल, अशी तंबीही आ. धोटे यांनी यावेळी दिली.

तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे माझ्या आणि आ. प्रतिभा धानोरकर यांच्या मतदार संघातील कामांसाठी निधी देत नव्हते. त्यांच्या या सापत्न वागणुकीसाठी आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आम्ही दोन आमदार आहोत म्हणून तुम्ही मंत्री आहात, असे मत त्यावेळी आम्ही व्यक्त केल्यानंतर कुठे त्यांनी आमच्या मतदार संघाला निधी दिला, असे स्फोटक वक्तव्यही आ. धोटे यांनी जिल्हाध्यक्ष होताच केले.

मला केवळ ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष म्हणू नका कारण माझ्या नियुक्तीपत्रात 'जिल्हाध्यक्ष' असाच उल्लेख आहे. रामू तिवारी हे शहराचे अध्यक्ष आहेत, असेही त्यांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्षांनी मागील पाच वर्षात तालुकाध्यक्षांची एकही बैठक जिल्हास्थानी बोलावली नाही, अशी तक्रार माझ्याकडे आली आहे. त्यामुळे लवकरच मी पंधराही तालुकाध्यक्षांची बैठक बोलावणार आहे. सर्व तालुक्यांचा दौरा करणार आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एक जिल्हास्तरीय शिबीर घेणार आहे. तसेच चंद्रपूर महानगरातही प्रभागनिहाय दौरे करणार आहे, असेही आ. धोटे म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने