Top News

पुढारी येईल आणि गावचा विकास होईल, या आशेवर राहू नका:- भास्कर पेरे पाटिल #chandrapur #bramhapuri


दिव्यदीप बहु. संस्थेद्वारा आयोजित पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमात प्रतिपादन

ब्रम्हपुरी:- देश महासत्ता करायचे असेल तर गाव स्वच्छ ,समृद्ध आणि स्वयंपूर्ण केले पाहिजेत. त्यासाठी गावात आर्थिक नियोजन बारकाईने होणे गरजेचे आहे. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या तर नागरिक कर द्यायला मागे राहत नाही,हे आम्ही आमच्या पाटोदा गावी सिद्ध केले आहे.पुढारी येईल आणि गावचा होईल, या आशेवर राहू नका. ग्रामपंचायतीने शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावातील नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने उत्पन्नाचे साधन निर्माण करावे, तरच गावाचा विकास होऊ शकतो. गावात स्वच्छ हवा, पाणी, आरोग्य व शिक्षण या गोष्टी करणे ही सरपंचाची जबाबदारी आहे. फळ झाडे लावा,आरोग्याची काळजी घ्या असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरीद्वारा आयोजित पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले.


दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रम्हपुरी या एनजीओच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन १५ जुलै २०२३ ला करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्निग्धा कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी संजय पुरी, ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनु नाकतोडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या विकासात गावाची भुमिका फार महत्वाची आहे. गावाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास होईल त्यासाठी गावांमधील सामाजिक व आर्थिक व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. गाव विकासात ग्रामपंचायतीची भुमिका फार महत्वाची आहे  त्यामुळे गावाच्या विकासासाठी झपाटून काम करण्याचे ध्येय सर्वांनी ठेवावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेने  वर्षभरात केलेल्या कार्याची माहिती दिली, मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने समाजासाठी काहीतरी करावे असे वाटून एनजीओ च्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत असे अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले. या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ब्रह्मपुरी चे गटविकास अधिकारी संजय पुरी यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व अश्या प्रकारचे आयोजन नक्कीच पंचायत राज सशक्तीकरण घडवून आणेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान  संस्थेच्या वर्षभराच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. 

          सदर कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक, रोजगार सेवक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या संस्थेच्या कार्यक्रमाला या सर्वांची  एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणे ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच वेळ असेल. 
         कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव सतीश डांगे यांनी केले तर आभार संस्थेचे सहसचिव ऍड. आशिष गोंडाने यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेश कांबळे, कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभूर्णे तसेच सदस्य डॉ. ज्योती दुफारे, वसुधा रामटेके, मंगेश नंदेश्वर, संजय बिंजवे, लखन साखरे, नरेश रहाटे यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने