Top News

ताडोबा प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून महिलांना संधी #chandrapur #Tadoba-andhari

चंद्रपूर:- चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून महिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, महिलांना अशी संधी देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. जिप्सी चालकाचे प्रशिक्षण देण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली, सीताराम पेठ, खुटवंडा, मुधोली यासारख्या 9 गावातील महिलांचे अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जांपैकी 84 महिलांची निवड करण्यात आली आणि यातील 30 महिलांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या सर्व जिप्सी चालक पुरुष आहेत. तर गाईड म्हणून जवळपास 25 महिला अतिशय उत्कृष्टपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. या प्रशिक्षणामुळे या महिलांना व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून तर संधी मिळेलच, सोबतच अनेक शासकीय विभागांमध्ये आणि खाजगी आस्थापनांमध्येदेखील चालक म्हणून संधी उपलब्ध होणार आहेत.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा आपल्या राज्यातीलच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय असलेला व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळेच वर्षभर ताडोबा हे देशी-विदेशी पर्यटकांनी प्रचंड गजबजलेला असतो. ताडोबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे देश-विदेशातून येथे पर्यटक येतात. मात्र दक्षिण भारतातून आणि विदेशातून येणार्‍या पर्यटकांना मराठी व हिंदी येत नसल्याने स्थानिक गाईड त्यांना ताडोबाची माहिती देऊ शकत नाहीत. हीच अडचण ओळखून पर्यटकांना टायगर सफारी घडविणार्‍या गाईड्ससाठी ताडोबा प्रशासनाच्या वतीने 'इंग्लिश स्पिकिंग'चे विशेष वर्ग सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, या पूर्वी म्हणजे 2020 ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गाईडची शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण अशी करण्यात आली होती. यासोबतच मराठी आणि हिंदी भाषेसोबतच इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक केले आहे. देशी-विदेशी पर्यटकांशी योग्य संवाद साधला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने