प्रश्न विचारणारे विद्यार्थी जगात संधी निर्माण करतात:- प्रा. विशाल ठाकरे #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर जिल्हा भोई समाज संघातर्फे उच्चशिक्षणावर मार्गदर्शन
चंद्रपूर:- जगभरात जे परिवर्तन होत आहे, त्याला नवनिर्मीतीचा मुलाधार आहे. नवनिर्मीती करणा-यांनाच प्रश्न पडतात. प्रश्नांची उकल करण्यात त्यांच्या हातून नवे शोध पुढे येतात. आपण सतत प्रश्न विचारणारे असलो पाहिजे. कारण प्रश्न विचारणारे विद्यार्थीच जगात संधी निर्माण करतात. असे प्रतिपादन अमेरिका येथील जगातील नामांकित टेक्सास विद्यापिठातील प्रा.विशाल ठाकरे यांनी केले. चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर आयोजित एकलव्य सभागृहात 'उच्चशिक्षणात भारत अमेरिकेच्या नजरेतून' या विषयावर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भोई समाज संघाचे अध्यक्ष कृष्णाजी नागपूरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश दुधपचारे, श्रीहरी शेंडे, अविनाश पोईनकर, देवराव पिंपळकर उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ.योगेश दुधपचारे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद करतांना अमेरिका देशाच्या शोधात भारताचे योगदान मांडले. अविनाश पोईनकर यांनी प्रा.विशाल ठाकरे यांचा परिचय व प्रेरणादायी वाटचाल उलगडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून कृष्णाजी नागपूरे यांनी विद्यार्थ्यांनी सतत क्रियाशील राहून ज्ञान आत्मसात करण्याची प्रक्रिया निरंतर ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन नितेश वाघाडे तर आभार नितेश जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूरातील विविध अभ्यासिकेतील विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती.


देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घ्या

जगातील पहिल्या १०० विद्यापीठात भारतातील एकही विद्यापीठाचा समावेश नाही. किमान आपण भारतातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेवून जगातील नामांकित विद्यापीठात शिकले पाहीजे. अमेरिका सरकारची १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मला उच्चशिक्षणासाठी मिळाली. अशा अनेक शिष्यवृत्ती जगभरात शिक्षण घेण्यासाठी भारत सरकार व विदेशी सरकारांच्या उपलब्ध असून अभ्यास आणि कर्तृत्वाने ते मिळवता येतात. देशाला दिशादर्शक काम करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रा.विशाल ठाकरे यांनी व्यक्त केले.