अवैध खनीज उत्खनन व वाहतूकबाबत जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर #chandrapur

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्ह्यातील खनिजांचे अवैध उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची कार्यवाही बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्यास खनिकर्म विभागाने पोलिस आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाला सोबत घेऊन अचानक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.

वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कुंभार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून खनीज वाहतूक केली जाते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, खनिजाची वाहतूक करतांना ट्रांझिंट पासची आवश्यकता असते. मात्र वेकोली करीता हा अपवाद असला तरी वाहतुकीसाठी त्यांचा रोड मायनिंग प्लान असतो. अवैध वाहतुकीबाबत खनीकर्म विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक विभागाने अचानक तपासणी करावी. तसेच खनीजाचा कोणताही साठा आणि डीलरशीपसाठी नोंदणी आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले, अवैध वाहतूक वेगळ्या मार्गाने होत आहे का आणि अधिकृत मार्गाने होणा-या वाहतुकीची वजनमर्यादा किती आहे, ते तपासावे. वनविभागाच्या खुल्या जागेवर अवैध खनीज साठा आढळल्यास त्याची वनविभागाने तपासणी करावी. जिल्ह्यात अवैध खनीज उत्खनन व अवैध वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी संबंधित विभागाने गांभिर्याने कार्यवाही करावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

पोलिस आणि आरटीओ विभागाच्या कारवाया

जानेवारी ते जून 2023 अखेरपर्यंत पोलिस विभागाने 65 कारवाया केल्या असून 11 लक्ष 24 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे. यात 46 ट्रॅक्टर, 27 हायवा आणि दोन जेसीबीचा समावेश आहे. तसेच या कारवायांमध्ये आतापर्यंत 141 आरोपींना अटक झाल्याची माहिती पोलिस विभागाने दिली. तर उप-प्रादेशिक परिवहन विभागाने ओव्हर लोड गौण खनीज वाहतुक संदर्भात 1 एप्रिल ते जून 2023 अखेरपर्यंत एकूण 25 वाहनांची तपासणी केली. यात 2 लक्ष 67 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून सात जण दोषी आढळल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.