Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योग प्रतिनिधींसोबत एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचा संवाद


कौशल्य आधारित शिक्षणाकरिता विद्यापीठाचा पुढाकार
चंद्रपूर:- एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे नव्याने सुरू झाले आहे. नुकतेच येथील अभ्यासक्रमांचा शुभारंभ राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत पार पडला. येथील विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी मिळावी सोबतच कौशल्य विकासाचे प्रत्यक्ष शिक्षण मिळावे यासाठी निड-बेस अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योग आणि विविध संस्थांचा लाभ येथील विद्यार्थिनींना प्रत्यक्ष घेता यावा जेणेकरून शिक्षण आणि अनुभव एकत्रित घेता येईल यासाठी दिनांक ४ ऑगस्ट रोजी कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनात आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील अनेक उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातीला बल्लारपूर संकुलाचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी सर्वांचे परिचय करून दिले व बैठकीचा हेतू सांगितला.

या बैठकीला प्र - कुलगुरू डॉ. रुबी ओझा यांनी मार्गदर्शन करून विद्यापीठाचा उद्देश सांगितला. विद्यापीठाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठ आपल्यापर्यंत आलय यात आपल्या सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

सदर बैठकीला विद्यापीठाच्या शैक्षणिक तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख तथा बल्लारपूर कॅम्पस च्या शैक्षणिक समन्वयक डॉ. जयश्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली व अभ्यासक्रमात स्थानिक गरज काय आहे जेणेकरून विद्यार्थिनींना कौशल्य आधारित शिक्षण मिळेल यासाठी आवश्यक बाबी विषद केल्या. सोबतच उपस्थित प्रतिनिधी मधून आवश्यक सूचना जाणून घेतले. यावेळी शैक्षणिक सल्लागार मंगेश इंदापवार, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त विशेषत्वाने उपस्थित होते. 

या आवारात प्रामुख्याने या सत्रात बीएमस-मार्केटींग मॅनेजमेंट, बीएमएस- प्रॉडक्ट अॅण्ड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, बीएमएस- रुग्णालय प्रशासन, बी.व्होक-फुड टेक्नॉलॉजी, बी.व्होक-इंटिरियर डिझाईन आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन हे अभ्यासक्रम सरू करण्यात आले आहे . हे सर्व अभ्यासक्रम नव्या शैक्षणीक धोरणातील घटकांना अनुसरून असून कौशल्य विकासावर भर देणारे आहे. 
सभेत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाला लागणाऱ्या महत्वाच्या विषयांवर  चर्चा करण्यात आली.
डॉ. जयश्री शिंदे यांनी उद्योजकांना प्रशिक्षनाकरीता विद्यापीठाकडून काय अपेक्षित आहे हे सर्व जाणून घेऊन विद्यापीठाला उद्योजकांकडून काय सहकार्य अपेक्षित आहे याबद्दल सांगितले. 
सदर आभासी बैठकीला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रतिनिधी यात प्रामुख्याने वनिता आहार उद्योगचे विनायक धोटे, रसराज रेस्टॉरंटचे विजयजी, CHL हॉस्पिटलचे डॉ. रोहण आईंचवार, मानवटकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. माधुरी मानवटकर, गुलवाडे हॉस्पिटल व इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ.मंगेश गुलवाडे, सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील सामाजिक अधीक्षक उमेश आडे, मायक्रोसॉफ्ट इंस्टीट्यूटचे सुनील दळवनकर, बिल्ट इंडस्ट्रीजचे अजय दुरगकर, वर्धमान इंडस्ट्रीजचे जीतेंद्र सुराना, अनुप सेल्सचे अनुप खातोड, खंडेलवाल इंडस्ट्रीजचे गोपाल खंडेलवाल, अकॉर्डीस फार्मसीटिकलच्या मीनाक्षी शिंदे, बांबू आर्टिस्ट मीनाक्षी वाळके आणि मुकेश वाळके, पालीवाल रुग्णालयाचे  डॉ.पालीवाल, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे मेश्राम आदी या आभासी बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत सकारात्मक संवाद झाला जेणेकरून भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना कौशल्य आधारित शिक्षणासाठी पुढे आणणे सोयीचे होईल. विद्यार्थिनींना प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन अभ्यास करायला मिळेल सोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळेल. विद्यापीठाच्या या पुढाकाराविषयी सर्व प्रतिनिधींनी कौतुक केले. या बैठकीचे आभार सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने