चंद्रपूर:- गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. याच उत्साहात, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूर येथील आपल्या निवासस्थानी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. या पूजनाने त्यांचे निवासस्थान भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी भारून गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी मिळून पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा-अर्चा केली.
या प्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, "गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ एक सण नाही, तर विघ्ने दूर करून सुकरतेकडे नेणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. गणरायाच्या चरणी मी महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल आणि पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना केली आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी गणरायाने आशीर्वाद द्यावा, अशी त्यांची भावना होती. 'महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो' अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.