चंद्रपूर:- गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९६ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.
सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी-विधानानुसार पूजा-अर्चा करण्यात आली. गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी केली.
या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, तसेच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट होवो अशी प्रार्थना केली.