Gadchiroli News : गडचिरोली-नारायणपूर सीमेवर 8 तास चकमक; 4 नक्षलवादी ठार

Bhairav Diwase

गडचिरोली:- गडचिरोलीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या माओवाद्यांमध्ये एका पुरुषाचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.


गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात पोलीस दलाने आज पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 व इतर माओवादी कोपर्शी जंगल परिसरात दबा धरून बसले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अभियान, श्री. एम. रमेश यांना मिळाली होती.


या माहितीच्या आधारे, श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके तात्काळ सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून या भागात प्रचंड पाऊस सुरू होता, त्यामुळे पोलीस पथकांना शोध मोहीम राबवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आज सकाळी पोलीस पथके जंगलात पोहोचली आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली.


शोध मोहिमेदरम्यान, माओवाद्यांनी पोलीस पथकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. सुमारे आठ तास ही चकमक सुरू होती. अखेर, चकमक थांबल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता, एकूण चार माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये एक पुरुष माओवादी आणि तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे.


याचबरोबर, घटनास्थळावरून पोलिसांनी 01 SLR रायफल, 02 INSAS रायफल आणि 01 .303 रायफल जप्त केली आहे. पोलीस दलाने माओवाद विरोधी अभियान या भागात अजूनही सुरू ठेवले आहे, जेणेकरून उर्वरित माओवाद्यांचा शोध घेता येईल. या मोहिमेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अधिक सविस्तर माहिती लवकरच वृत्तपत्रांद्वारे कळविण्यात येईल.