गडचिरोली:- भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिला अर्चना विकास तिम्मा हिला आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०० वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एस.डी.आर.एफ.) पथकाच्या मदतीने पामूलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिला आहे.
छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीची पातळी वाढली होती. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने काल संध्याकाळपासून सतत लक्ष ठेवले होते. जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांच्या सूचनेनुसार रात्री ११.०० वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे रवाना करण्यात आले. या तत्पर कारवाईमुळे गर्भवती महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.
दरम्यान, भामरागडच्या मुख्य बाजारपेठेत पर्लकोटा नदीचे पाणी शिरले असून सुमारे ३० ते ३५ दुकानांत पाणी घुसले आहे. मात्र, प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी काल रात्रीच आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलविल्याने मोठे नुकसान टळले आहे. लगतच्या भागात पावसाचे प्रमाण सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.