Vasudev Madavi : १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालणारे वासुदेव मडावी ठरले अनोखे 'शतकवीर'

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली पोलीस दलामध्ये आजपावेतो अनेक उत्कृष्ठ अधिकारी आणि अंमलदारांनी उत्कृष्ठ सेवा बजावून माओवाद विरोधी लढाईमध्ये महत्वपूर्ण योगदान दिल आहे. यापैकीच सर्वात महत्वपूर्ण पार्टी कमांडर यांच्या पैकी एक पोउपनि. श्री. वासुदेव मडावी हे सन 1998 मध्ये गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर रुजू झाले. त्यांनी माओवाद्यांविरुद्ध लढणा­या विशेष अभियान पथकामध्ये 26 वर्षांहून अधिक काळ कर्तव्य बजावले आहे. पोलीस शिपाई ते पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात 03 वेगवर्धीत पदोन्नती मिळाल्या आहेत, ज्या त्यांच्या असाधारण योगदानाचे आणि नेतृत्व कौशल्याचे प्रतिक आहेत. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात, पोउपनि. वासुदेव मडावी यांनी एकूण 58 चकमकींमध्ये थेट सहभागी होऊन आजपावेतो एकूण 101 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच एकूण 05 जहाल माओवाद्यांनाही त्यांनी अटक देखील केलेली आहे. त्यांच्या अभियानातील कौशल्य आणि निर्भय दृष्टिकोनामुळे त्यांना सी-60 पथकामध्ये एक महत्वपूर्ण पार्टीं कमांडर बनवले आहे, ज्याचे नेतृत्व ते 48 व्या वर्षीही करत आहेत. 
सर्वात धोकादायक परिस्थितीतही नेतृत्व करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे त्यांना त्यांच्या सहकारी अधिकारी व अंमलदार तसेच वरिष्ठांकडून देखील आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देखील मिळाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांचे आणखी दोन पोलीस शौर्य पदकासाठीचे प्रस्ताव सध्या विचाराधीन आहेत. यासोबतच त्यांना महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडून मिळणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देखील प्राप्त झाले आहे. 
 खालील यशस्वी चकमकींमध्ये पोउपनि. श्री. वासुदेव मडावी यांनी महत्वपूर्ण कामगिरी निभावलेली आहे.
1. बोरीया कसनासूर - एकूण 40 माओवाद्यांना कंठस्नान, 
2. गोविंदगाव चकमक - एकूण 06 माओवाद्यांना कंठस्नान
3. मर्दिनटोला चकमक - एकूण 27 माओवाद्यांना कंठस्नान
4. कोपर्शी-कोढूर चकमक - एकूण 05 माओवाद्यांना कंठस्नान
5. कतरंगट्टा चकमक - एकूण 03 माओवाद्यांना कंठस्नान
6. कोपर्शी चकमक - एकूण 04 माओवाद्यांना कंठस्नान


अशाप्रकारे पोउपनि. वासुदेव मडावी यांनी काल झालेल्या कोपर्शी चकमकीत 04 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालून एकूण 101 माओवाद्यांना कंठस्नान घालण्याची कामगिरी बजावलेली आहे. यांच्या दीर्घ अनुभवामूळे तसेच शौर्य आणि नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामूळे त्यांनी आजपावेतो उत्कृष्ट यश संपादन केले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दलात महत्वपूर्ण सेवा बजावली आहे. या माध्यमातून त्यांनी शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या व्यापक प्रयत्नांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कमगिरीबद्दल आज रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते इतर वरीष्ठ अधिका­यांच्या उपस्थितीत पोउपनि. वासुदेव मडावी यांचा गौरव करण्यात आला आहे.