Top News

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरल्याचा अतीव आनंद:- मुनगंटीवार #chandrayaan3देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालाच्या सुरुवातीलाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश ठरल्याचा अतीव आनंद झाला असून त्याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम यशस्वी झाली त्या विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे देशाच्या प्रत्येक नागरिकाचेही अभिनंदन करतो अश्या शब्दात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चांद्रयान-३ च्या यशस्वी चंद्रावतरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमृतकालाची ही अतिशय सुंदर सुरुवात झाली असल्याचेही ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यावेळी पुढे म्हणाले की, भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील ही मोठी झेप मानवाचे अंतराळ यात्रेतील भविष्य निश्चित करणारी ठरणार आहे. जागतिक पातळीवर इस्रो ने आपला ठसा या आधीच उमटवला आहे. आता अमृतकालाच्या सुरुवातीलाच चंद्राच्या दक्षिणध्रुवावर चांद्रयान यशस्वीरित्या उतरवून इस्रो ने यापुढे जागतिक पातळीवर अंतराळ क्षेत्रातही भारतच नेतृत्व करणार असल्याचे दाखवून दिले आहे, भारताच्या अंतराळ युगाची ही सुरुवात निश्चितच आनंददायी आहे, असेही ते म्हणाले. चांद्रयान -२ मिशनच्या अपयशातून धडा घेत इस्रो ने ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने चंद्रयान -३ मिशन राबविले, ते कौतुकास्पद आहे, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. नुकतेच रशियाचे "लुना" हे यान चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरून नष्ट झाले होते, त्या पार्श्वभूमीवर भारताचे आजचे यश अधिकच मोठे ठरते, असेही ते म्हणाले.

भारतीय वैज्ञानिकांनी अवकाश क्षेत्रात भविष्यात याहून मोठे यश मिळवावे, विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांना या क्षेत्रातील संशोधनासाठी काही कमी पडाणार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने