आज सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल .
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 19 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला. मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन शास्त्राने दिले तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.
या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.