चंद्रपूर:- वैद्यकिय रजा मंजूर करण्याकरीता शिक्षकाकडून आठ हजाराची लाच घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिऱ्याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.
या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज बुधवारी सावली पंचायत समिती मध्ये करण्यात आली. लोकेश खंडारे असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. विस्तार अधिकारी असलेले खंडारे यांचेकडे शिक्षणाधिकाऱ्याच सध्या प्रभार होता.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूल येथील असून ते प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते सहा महिने वैद्यकिय रजेवर गेले होते. त्यांच्या रजा मंजूर नसल्याने त्यांना या काळातील वेतन देण्यात आले नाही. त्यांनी सदर कालावधीमधील त्यांचे वैद्यकिय रजा मंजूर करण्याकरीता त्यांनी सावली पंचायत समिती शिक्षण विभागाल पत्रव्यवहार करण्यात आला होता. याबाबत शिक्षक नेहमीच सावली पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिझवत होता. विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत तथा सध्या गट शिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार असलेले खंडारे हे वैद्यकिय रजा मंजूर करण्याकरीता लाचेची मागणी करीत होते.
तक्रारदार यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाला तक्रार केली होती. सावली पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी लोकेश खंडारे यांच्या विरोधातील तक्रारीची पडताळणी करण्यात येऊन बुधवारी (27 सप्टेंबर) चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागात त्यांना आठ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सावली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.