आदिवासी बांधवांच्या विरोधानंतरही घुग्घूसमध्ये रावणदहन #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- तालुक्यातील घुग्घुस येथे दि.२४ ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी रावणदहनास विरोध केला होता, तरीही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले.

परिसरात तणाव होऊ नये, यासाठी तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला- पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. त्यानंतर पोलिस ठाण्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी मोर्चा काढून आदिवासी बांधवांनी या घटनेचा निषेध केला.

चंद्रपूरातील घुग्घूस शहरात आज बहादे प्लॉटमध्ये विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. याकरीता रावणाची प्रतिकात्मक प्रतिमा सकाळी तयार करण्यात येत होता. घुग्घूस शहरातील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहेत. त्यांचे दहन करण्यात येत असल्याने आदिवासी समाजातील बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावणदहन करू नये, अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली.

तसेच शासन, प्रशासन, नगर परिषद, पोलिस ठाणे व मंत्री महोदयांना निवेदन देऊन रावणदहनला परवानगी देण्यात येवू नये, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर सकाळी आदिवासी बांधवांनी रावणदहनाला विरोध करीत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला. परिसरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व शंभरावर आदिवासी बांधवांना ताब्यात घेतले. व त्यांची भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यात आली तसेच घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

आदिवासी बांधवांच्या विरोधानंतर घुग्घूस येथील रावणदहन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवसभर आदिवासी बांधव पोलिस ठाण्यात स्थानबध्द असल्याने रावणदहन विरोधाचे वातावरण शांत झाले होते. त्यामुळे सायंकाळी रावणदहनाची बहादे प्लॉटवर तयारी करण्यात आली. बहादे प्लॉटवर रावणाची प्रतिमा उभी करण्यात आली. सायंकाळी त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉटवर उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात असलेल्या आदिवासी महिला – पुरूषांना सोडण्यात आले. सुटकेनंतर आदिवासी बांधवांनी पोलिस ठाण्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पायी मोर्चा काढला. त्यानंतर या ठिकाणी सभेचे आयोजन करून शासनाविषयी संताप व्यक्त करीत रावणदहनाच्या घटनेचा निषेध केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)