Top News

डेटा दीड जीबी; सारं गाव सतत बिझी! #Chandrapur


रिल्स, मालिका, गेमची अनेकांना भुरळ

चंद्रपूर:- सद्यस्थितीत शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण परिसरातही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आबालवृद्धांसह महिलांनाही कामे आटोपल्यावर डेटा वापराची सवय जडली असल्याने गावातील नागरिक मोबाइल फोनमध्ये व्यस्त असल्याने 'डेटा दीड जीबी अन् सारा गाव सतत बिझी' अशी परिस्थिती चंद्रपूरसह ग्रामीण परिसरातील गावांची झाली आहे. आधी २ जी, ३ जी नंतर ४ जी व आता ५ जी सेवेमुळे इंटरनेट इतके गतिमान झाले आहे की, अनेकांना दिवसभराचा दीड जीबी डेटादेखील पुरेनासा झालाय.

सोशल मीडियावर येणारे रिल्स, चित्रपट, गाणी आवडत्या मालिका पाहण्यात दीड जीबी डेटा कधी संपला, हे लक्षातही येत नाही. अलीकडच्या काही वर्षांत फेसबुक, व्हॉट्स ॲप, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे मोबाइलवर चित्रपट, मालिका, गाणी पाहण्यापासून ते स्वतःचे रिल्स तयार करून व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यापर्यंत इंटरनेटची सर्वाधिक गरज भासते. फोटो देवाण-घेवाण व कोणत्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका, संदेश इतकेच काय तर पैशाची देवाण घेवाणही इंटरनेटच्या माध्यमातून व्हायला लागल्याने बहुतांश नोकरदार, गृहिणी व तरुणाई दररोज दीड जीबी डेटा मिळेल,असे मोबाइलचे रिचार्ज करतात. परंतु,नोकरदार वगळता इतरांना हा डेटा अर्धा दिवसही पुरत नाही, हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने