विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर होते:- डॉ. राहुल साळवे. #bhadrawati

Bhairav Diwase



भद्रावती: डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी "अंधश्रद्धा" या बाबीचा सगळ्या बाजूंनी विचार केला, आणि तो विवेक बुद्धीने विज्ञान- निर्भयता- नीती हे ब्रीदवाक्य अंगीकृत करून साधना मासिकातून सातत्याने मांडला. अंधश्रद्धेच्या प्रश्नावर निशांत सर्जन प्रमाणे काम केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात क्रोधापेक्षा करुणेची आणि उपासापेक्षा आपुलकीची गरज असते हे दाभोलकरांनी पटवून दिले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांना संघटित रूप देण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या शहीद डॉ .नरेंद्र दाभोलकरांची जयंती म्हणजे विवेकाचा आवाज आहे असे अभिमत महाराष्ट्र अंनिस तालुका अध्यक्ष डॉ.राहुल साळवे यांनी भद्रावती येथील जयंती दिनानिमित्त कार्यक्रम प्रसंगी मांडले.


सगळ्या परिवर्तनाची सुरुवात ही विचार बदला पासून होते ,विचाराला ज्यावेळी मूल्याचा आश्रय मिळतो तेव्हा आपण त्याला विवेक म्हणतो. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला .तोच वारसा आम्ही चालवतो असा विचार दाभोलकरांनी मांडला होता याची आठवण जयंती दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र अंनिस मार्गदर्शक सल्लागार, जनमंच सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी करून दिली. डॉ .नरेंद्र दाभोलकर जयंती निमित्त नामदेव रामटेके, श्रीधर भगत, सुदास खोब्रागडे ,शारदा खोब्रागडे, लता टिपले, मुक्ताबाई पेटकर आदींनी महाराष्ट्र अंनिस संस्थापक व चळवळीचे प्रणेते डॉ .नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करीत जन्मदिन साजरा केला.