रात्री झोपेत होता तरूण, सापाने चावा घेतला अन् मृत्यू झाला

Bhairav Diwase
देसाईगंज:- रात्री झोपेत सापाने दंश केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.11) देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे पहाटेच्या सुमारास घडली. अशोक मनोहर लेनगुरे ( 28 ) असे मृतक युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, अशोक लेनगुरे हा कोंढाळा गावापासून एक किमी अंतरावरील लहरी कारखान्यात रात्र पाळीत काम करीत होता. दरम्यान, मध्यरात्र झाल्याने तो झोपी गेला असता, अचानकपणे हाताच्या बोटांना काहीतरी दंश केल्याची जाणीव त्याला झाली. त्यामुळे तो खळबळून जागा झाला. त्याच्यासोबत झोपलेल्या दुसरा व्यक्तीही जागा झाला. त्याने इकडे-तिकडे शोधले असता खोलीत त्याला साप दिसला. याची माहिती त्याने लेनगुरे कुटूंबिय व गावकऱ्यांना दिली.

माहिती कळताच कुटुंबिय व ग्रामस्थांनी धाव घेऊन अशोकला रात्री 2 वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे भरती केले. मात्र, काही कारणास्तव अशोकला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोली येथे उपचार सुरु असताना अशोकची प्रकृती आणखीनच बिघडली. दरम्यान, पहाटेच्या सुमारास अशोकजी प्राणज्योत मावळली.