दारूच्या नशेत ५०० रुपये चोरल्याने एकाचा खून


पुणे:- दारुच्या नशेत ५०० रुपये चोरल्याने एकाने मित्राला बांबूने बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगरपोलिसांनी एकाला अटक केली.

किरण अशोक साठे (२४, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर लोकेश रवींद्र पाटील (२३, रा. पाटीलवस्ती, केसनंद, नगर रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके यांनी याप्रकरणी चंदननगरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे आणि पाटील मित्र होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत साठेने पाटील याच्या खिशातून ५०० रुपयांची नोट चोरली होती. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. पाटील याने साठेला बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साठेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लोकेश पाटील याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या