पत्नीसोबत वाद; रेल्वेखाली दिले झोकून, लेकानंतर पित्याने मृत्यूला कवटाळले #chandrapur #death

चंद्रपूर:- आई-वडील यांच्यात सतत होणाऱ्या वादाला कंटाळून एकुलत्या एक मुलाने काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन मृत्यूला जवळ केले. आणि आता त्याच्या वडिलांनीही ऐन दिवाळीच्या दिवशी रेल्वेखाली उडी घेऊन स्वतःला मृत्यूच्या मिठीत झोकून दिले.

मनाला चटका लावणारी ही हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १२ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान चंद्रपुरातील बाबुपेठ रेल्वे मार्गावर घडली. निर्दोष नामदेव जयकर (वय ४६, रा. विसापूर) असे मृत पित्याचे नाव आहे.

मूळचा विसापूर येथील रहिवासी व चंद्रपूर येथील एका गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात कामाला असलेल्या निर्दोष जयकर याचा विवाह अठरा वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर त्यांच्या संसार वेलीवर प्रियांशु नावाचा मुलगा आला. त्याच्या जन्मानंतर काही वर्षानंतरच निर्दोष आणि पत्नीमध्ये मतभेद सुरू झाले व त्यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यामुळे पत्नीने त्याला व मुलगा प्रियांशु याला विसापूरवरून माहेरी, चंद्रपूर येथील भिवापूर वार्डातील वडिलांच्या घरी आणले. मात्र येथेही दोघांतील मतभेद संपले नाहीत.

आईवडिल यांच्यातील हा सततचा वाद मुलगा प्रियांशु दररोज पाहत होता. त्याला कंटाळलेल्या प्रियांशुने एका क्षुल्लक कारणावरून चिडून १० जुलै २०२३ रोजी घरीच गळफास घेतला व जीवनयात्रा संपवली. प्रियांशुच्या आत्महत्येनंतर निर्दोष व त्याच्या पत्नीतील मतभेद आणखीनच तीव्र झालेत.त्यांच्यात दररोज भांडणे होऊ लागली. या सततच्या वादांना कंटाळून अखेर निर्दोषने मुलाचाच, प्रियांशुचाच मार्ग स्वीकारला व दिवाळीच्या दिवशी, रविवारी बल्लारपूर - चंद्रपूर रेल्वे मार्गावर रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली.
या घटनेची तक्रार निर्दोष याचा मोठा भाऊ अमर नामदेव जयकर याने चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात केली. या प्रकरणी निर्दोषच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी अंत्यसंस्काराला आलीच नाही

निर्दोष जयकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रविवारीच करण्यात आले. त्यानंतर रात्री त्याचा मृतदेह विसापूर येथे आणण्यात आला. त्याबाबतची माहिती पोलिसांनी मृत निर्दोषच्या पत्नीला दिली. मात्र तिने बाहेरगावी असल्याचे सांगितले. सोमवारी विसापूर येथील स्मशानभूमीवर निर्दोषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या