शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार #chandrapur #gadchiroli #tigerattack

Bhairav Diwase

गडचिरोली:- धान बांधणीनंतर शेतातील शिल्लक लाेंबी वेचण्यासाठी जाणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शुक्रवार २४ नाेव्हेंबर राेजी दुपारच्या सुमारास हिरापूर येथील कंपार्टमेंट नं. १६६ मधील शेतशिवारात घडली. इंदिराबाई उमाजी खेडेकर (५५) रा. हिरापूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या. परंतु याच वेळी रस्त्यालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने इंदिराबाईवर हल्ला करून त्यांना झुडपात फरफटत नेले. सायंकाळ हाेऊनही इंदिराबाई घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा शाेध घेण्यासाठी कुटुंबीयांनी शेताच्या दिशेने धाव घेतली व शाेध सुरू केला. तेव्हा सायंकाळी सात वाजताच्या सुमारास इंदिराबाई यांचा मृतदेह पाथरगोट्याजवळ आढळला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व इंदिराबाईंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, सुना, नातवंड आहेत.