पिकांची राखण जीवावर बेतली, रानटी हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी ठार #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

गडचिरोली:- शेतात आलेल्या रानटी हत्तीना परतावून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एका हत्तीने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मरेगावनजीक घडली. मनोज प्रभाकर येरमे (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून हा कळप गडचिरोली तालुक्यातील गोगाव, अडपल्ली, दिभना, मौशीखांब, चांभार्डा, मरेगाव या परिसरात फिरत आहे. हे हत्ती धानाच्या गंजीचे नुकसान करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी हे हत्ती शेतात आल्याचे कळताच मनोज येरमे काही शेतकऱ्यांसह शेतावर गेले. हत्तींना परतावून लावत सायकलने परत येत असताना एका हत्तीने मनोजवर हल्ला केला आणि सोंडेने आपटून ठार केले. वनविभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.