धक्कादायक! पोलीस कर्मचारीच घरफोडीच्या गुन्ह्यात सामील #chandrapur #police

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- नागरिकांचं चोरट्यांपासून संरक्षण करणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं. मात्र चंद्रपूर पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच घरफोडीच्या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आले आहे.


त्याने सात घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे. जनतेचा रक्षक असलेला पोलीस घरफोडीचा आरोपी निघाल्याने चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.



चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला एक वर्दीतील पोलिसच घरफोडीचा आरोपी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस कर्मचारी नरेश डाहुलेकडून 6,900 रुपयांची रोकड आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला रॉड जप्त केला आहे. या प्रकरणात सदर आरोपीने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून चंद्रपूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


प्रकरणी मुस्तफा रमजान शेख यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्याचा भाऊ इरफान शेख मक्का आणि मदिना येथे गेले असता घरात चोरी झाल्याचे दिसले. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३८०, ४५४ आणि ४५७ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शनिवारी रात्री बंगाली कॅम्पमध्ये राहणारा गुन्हे शाखेचा हवालदार नरेश डाहुले याला अटक केली. नरेश डाहुले हा घरफोडीमध्ये सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्याच्यावर नजर होती, असे सांगण्यात येते. कारण याआधीही त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला सावध केले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने शुक्रवारी रात्री नरेशला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी रामनगर पोलीस तपास करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पोलीस हवालदाराच्या अटकेला दुजोरा दिला आहे.



समाजात कायदा सुव्यवस्था व शांतता प्रस्थापित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस व्यवस्था असते. सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांबद्दल विश्वास असतो. मात्र वर्दीतील पोलीसानेच चोरी केल्यामुळे हा विश्वास खोटा ठरला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर चंद्रपुर पोलिसांत खळबळ माजली आहे. जनतेचा सुरक्षा रक्षक पोलीसच चोर निघाल्याचे पहायला मिळतं आहे. चंद्रपूर शहरातील सहकारनगर भागात काही दिवसांपूर्वी 4 हजारांची तर सप्टेंबर महिन्यात उपगणलावार ले-आऊट मध्ये 80 हजारांची घरफोडी झाली होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडी नरेश डाहुले यानेच केल्याचं निष्पन्न झालं आहे.



पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या व्यसनामुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर 22 लाखांचं कर्ज झालं होतं. त्यातून बाहेर पाडण्यासाठी त्याने हे दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करत आरोपीला गजाआड केले. मात्र नरेश डाहुलेच्या अटकेमुळे चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)