विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध; नगराध्यक्षाला अटक #chandrapur #sindewahi


पत्रक अन् बॅनर फाडले; लेखापालाच्या हातून हिसकावला माईक

सिंदेवाही:- शासनाच्या वतीने सिंदेवाही येथे सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला विरोध दर्शविल्यामुळे सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांच्यावर कलम ३५३, ५०६ अन्वये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून शुक्रवार, दि. २६ जानेवारी रोजी अटक केली. नगराध्यक्षाला अटक झाल्याची माहिती होताच पोलिस ठाण्यात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी जमाव केला होता. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.


शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने शासनातर्फे विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम सुरू केली आहे. सदर मोहिमेत योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय अधिकारी हे चित्ररथासह गावोगाव पिंजून काढत आहेत. संकल्प यात्रा दि. २४ जानेवारी रोजी नगरपंचायत, सिंदेवाहीच्या आवारात घेण्यात येणार होता, तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. शासकीय अधिकाऱ्यांसह एलईडी स्क्रीन व बॅनर असलेले वाहन हे सदर ठिकाणी उभे करण्यात आले होते.

दरम्यान, दुपारी ३ वाजता लेखाधिकारी सुरज गायकवाड शासकीय योजनांची माहिती देत असताना नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी अचानक येऊन गायकवाड यांच्या हातातील माईक जबरदस्तीने हिसकावला. तसेच संकल्प रथाच्या वाहनावर चढून शासकीय योजनांची माहिती असलेले पत्रके काढून घेतली.

नगरपंचायतमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमा दरम्यान लावलेल्या बॅनरमध्ये नगराध्यक्ष कावळे त्यांचा नावाचा उल्लेख दिसला. मला न विचारता तुम्ही नाव कसे लिहिले असे बोलून त्यांनी शासकीय योजनांची माहिती देताना लेखापालाच्या हातातून माईक हिसकावून घेतला, बॅनर, पत्रक फाडले

याबाबतची तक्रार दि. २६ जानेवारी रोजी सिंदेवाही ठाण्यात करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी कावळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन जामीन मंजूर केला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक सागर महल्ले यांच्या पोलिस कर्मचारी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या