चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर (बफर) वनपरिक्षेत्रातील वाघाचा मृतदेह सोमवार, 15 जानेवारी रोजी आढळून आला. त्याचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा, असा अंदाज वनविभागाने प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे.
चंद्रपूर बफर वनपरिक्षेत्रातील बोर्डा नियतक्षेत्र शेत सर्व्हे क्रमांक 250-1 मध्ये (ढ-51) नर वाघ मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले. सोमवारी वनकर्मचारी गस्तीवर असताना ही बाब निदर्शनास आली.
वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक संकेत वाठोरे, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, मुकेश भांदकर यांनी घटनास्थळी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली. पंचनामा करून वाघाचा मृतदेह दफन करण्यात आला. मृत वाघाचे वय हे जवळपास 12 वर्ष आहे. वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. कुंदन पोडचेलवार यांनी केली.