स्पार्क युवाच्या युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन.

स्वच्छता दिंडी, ग्रामसफाई, समूह चर्चेत रंगली तरुणाई.

चंद्रपूर:- स्पार्क जनविकास फाउंडेशन प्रणित स्पार्क युवाच्या वतीने आगरझरी (ताडोबा) येथे आयोजित युवा प्रशिक्षण शिबिराचे आज (ता. 9) उत्साहात उद्घाटन झाले. सकाळपासून रात्री पर्यंत आयोजित विविध उपक्रमात तरुणाई उत्साहाने सहभागी झाली.


कार्यक्रमाचे उद्घाटन राजुरा येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, देशोन्नतीचे कार्यकारी संपादक आनंद आंबेकर, पुण्यनगरीचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटिक, आगरझरी येथील पोलिस पाटील सिंधुताई आत्राम उपस्थित होत्या.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्घाटनपर भाषणात बोलताना अविनाश जाधव म्हणाले, आजच्या तरुणाईला मार्गदर्शनाची गरज आहे. शाळा, महाविद्यालयातून त्याच्यातील व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, अशा शिक्षणाचा अभाव आहे. त्यासाठी स्पार्कने आयोजित केलेल्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिराची आवश्यकता भासते. यातून युवांना दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. वरकड यांनी आपल्या भाषणातून तरुणाईला स्वत्वाचा शोध घेण्याचा संदेश दिला. ज्या क्षेत्रात पोकळी आहे, त्या क्षेत्रात तरुणाईला संधी आहे. ही संधी युवांनी साधायला हवी, असे सांगत शून्य असतानाही मोठे झालेल्यांची उदाहरणे त्यांनी दिली.
मंगेश खाटिक यांनी प्रास्ताविकातून स्पार्क जनविकास फाउंडेशन आणि स्पार्क युवाच्या उद्देशाची माहिती दिली. आनंद आंबेकर यांनी युवांनी मनावर घेतले तर तो काय करू शकतो, हे सोदाहरण सांगितले. संचालन स्पार्क युवाची चंद्रपूर जिल्हा संयोजक राधिका दोरखंडे हिने केले. आभार दर्शन मेश्राम यांनी मानले.


तत्पूर्वी सकाळी आगरझरी गावात विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडी काढली. ग्राम स्वच्छता केली. गावातील रस्त्यावरचा प्लास्टिक कचरा गोळा केला. दुपारच्या सत्रात 'भारताच्या जडणघडणीत युवांची भूमिका' या विषयावर समूह चर्चा झाली. चर्चेनंतर प्रत्येक समूहाने उत्स्फूर्तपणे विषयाची मांडणी केली. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी विविध तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अविनाश दोरखंडे, शिरीष आंबेकर, चंद्रकांत पतरंगे, छोटूलाल सोमलकर, क्रांतिवीर सिडाम आदी शिबिराच्या यशस्वितेकरिता सहकार्य करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने