अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया #chandrapur #Budget

Bhairav Diwase
0


देशाचा शास्वत व सर्वसमावेशक विकास साधणारा अर्थसंकल्प:- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

चंद्रपूर:- देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला जी सितारमन यांनी सन 2024-25 करीता संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला विकसीत राष्ट्रांच्या रांगेत आणण्याचे ध्येय अंतर्भूत असून हे अर्थसंकल्प गरीब, महिला, युवक व बळीराजाला समर्पित असून या अर्थसंकल्पाद्वारे माननिय मोदी सरकारच्या ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास व सर्वांचा विश्वास’ या धोरणाशी सुसंगत असल्याची प्रतिकीया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

देशातील पायाभूत सुविधांसाठी 11.11 लक्ष कोटींची तरतूद विकासाला नवी दिशा देणारी ठरेल 7 लक्ष रूपये वार्षिक उत्पन्नावर करदात्यांना करसुट देण्यात आली असल्याने मोठ्या संख्येतील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. गेल्या 10 वर्षात सरकारने 390 कृषी विद्यापीठ, 7 आयआयटी, 7 आयआयएम व 3 हजारहून अधिक आयटीआय संस्थांची उभारणी केली. जीएसटीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना यशस्वीपणे साकार करण्यात सरकार यशस्वी ठरले. महिला सशक्तीकरण, ग्रामिण महिलांना 70 टक्के घरे, शेती क्षेत्रातून 3 लक्ष कोटीचा व्यापार, 80 कोटी लोकांना मोफत शिधा देण्यात सरकार सफल झाले आहे.


युवकांना सुवर्णकाळ लाभण्यासाठी 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्ज योजनेसाठी 1 लक्ष कोटीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यास 517 नवीन विमानमार्ग प्रस्तावित केले आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना 9 ते 14 वर्षीय मुलींसाठी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधासाठी लस, सोलर पॅनलद्वारे 1 कोटी घरांना महिनाभरात 300 युनिट मोफत विज पुरविण्याचे धोरण, आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ, उच्च शिक्षणात महिलांचा टक्का वाढविण्याचे धोरण, मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना 30 कोटी कर्ज वितरण, देशात गोदामांची उभारणी, किसान संपदा योजनेतून 38 लक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्याचे धोरण, 5 वर्षात ग्रामिण क्षेत्रात 2 कोटी घरांची उभारणी करण्याचा मनोदय सरकारने या अर्थसंकल्पातून व्यक्त केला असून अमृत कालात शास्वत व सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत वृध्दी संसाधनात गुंतवणूक हे सरकारचे धोरण शक्तीशाली अर्थव्यवस्थेला चालना देणारे असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असलेला अर्थसंकल्‍प - ना. सुधीर मुनगंटीवार 


चंद्रपूर:- आज देशाच्‍या अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांनी देशाचा अंतरीम अर्थसंकल्‍प सादर केला. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्‍ट्र करण्‍याच्‍या दृष्‍टीने असणा-या योजना ही या अर्थसंकल्‍पाची विशेषता आहे. 

मागील १० वर्षात देशाच्‍या सर्व घटकांच्‍या सर्वांगिण विकासासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींनी अनेक योजना चालविल्‍या, ज्‍यामुळे गरीब, तरूण, महिला, शेतकरी, दिव्‍यांग यांच्‍या जिवनात आमुलाग्र बदल झाला आहे. या अर्थसंकल्‍पात पुढील ५ वर्षात गरीबांसाठी २ कोटी घरे बांधल्‍या जातील तसेच मध्‍यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे. 

रूफटॉप सोलर प्‍लॅन अंतर्गत १ कोटी घरांना ३०० युनिट दर महिन्‍याला मोफत मिळणार आहे. याशिवाय कृषी, रेल्‍वे, स्‍कील इंडिया, महिला, युवा या सगळयांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्‍यात आली. मी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व अर्थमंत्री मा. निर्मलाजी सितारामन यांचे या उत्‍तम अर्थसंकल्‍पाबद्दल अभिनंदन करतो.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा व विकसित भारताच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने साकार करणारा अर्थसंकल्प:- आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया

चिमूर:- पुन्हा एकदा सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पाबद्दल माननिय अर्थमंत्री व माननिय पंतप्रधानांचे मनापासून आभार. भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. शेतकरी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार, पर्यटन सर्व गोष्टींकडे लक्ष देणारा अर्थसंकल्प आहे. देशाला नवी दिशा आणि नव्या आशा मिळाल्या असून सरकार सबका साथ आणि सबका विकास यावर काम करत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या १० वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी हे सरकारचे मुख्य प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करणे देशासाठी महत्त्वाचे असून या दिशेने काम केले जात आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक घरात पाणी आणि प्रत्येक घरात वीज तसेच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे. लोकांसाठी संधी वाढवल्या जात आहेत.

देशातील सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असा व दिलासा देणारा अर्थसंकल्प असून विकसित भारताच्या संकल्पाला खऱ्या अर्थाने साकार करणारा अर्थसंकल्प आहे. रामराज्य येण्याची ही नांदी आहे. असे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी म्हटले आहे.


आजचा अर्थसंकल्प विकसित राष्ट्राचा पाया, राज्याच्या विकासाला मिळणार गती:- आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर:- आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, युवक, महिला, गरिब आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला असून यात जिडीपी वाढीकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचा नक्कीच महाराष्टाला फायदा होणार आहे. या अर्थसंकल्पाचा एकंदरीत विचार केला असता आजचा अर्थसंकल्प हा विकसित राष्ट्राचा पाया असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे. यात आज सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. या सरकाच्या कार्यकाळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर केंद्र सरकारचा भर राहिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. सूर्योदय योजनेंतर्गत एक कोटी लोकांच्या घरात सौर रूफटॉप यंत्रणा बसवली जाणार आहे.त्यामुळे ३०० युनिट पर्यंतची वीज सदर कुटुंबियांना मोफत मिळण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आणखी 2 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले जाईल त्यामुळे अनेकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 10 वर्षात महिलांना 30 कोटी रुपयांचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे. विविध क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. आज सादर केलेल्या अर्थसकंल्पात आर्थिक क्षेत्र मजबूत होणार असून लोकांसाठी नवीन संधी वाढणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.


आश्वासनाचे गाजर दाखवणारा निराशाजनक अर्थसंकल्प:- आमदार सुभाष धोटे 

चंद्रपूर:- येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूकांपुर्ते आश्वासनाचे गाजर दाखवणारा निराशाजनक अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून सादर करण्यात आला असून, यात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला, उद्योजक, व्यापारी, कर्मचारी, मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेच्या पदरी घोर निराशाच पडली आहे.

प्रत्यक्षात या सर्व घटकांना मागील दहा वर्षांपासून जी मोठ मोठी आश्वासने केंद्र सरकारने दिली त्यांची पुर्तता करण्यासाठी ठोस पावले उचलून भरीव तरतूदी अर्थसंकल्पात करण्याची गरज होती.

मात्र सर्वसामान्य माणसाच्या वेदनांवर केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले आहे. देशातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव नसल्याने अन्नदाता विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे त्यासाठी कुठलेही धोरण नाही, महागाई कमी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.


विकसित भारताकडे नेणारा अर्थसंकल्प:- डॉ. अशोक जीवतोडे 

चंद्रपूर:- अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील विविध क्षेत्राकरीता अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प भारताला विकसित करणारा अर्थसंकल्प आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राकरीता १,१२,८९८ कोटी, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, मिशन इंद्रधनुष्य योजना, ७ नव्या आयआयटी व ७ नव्या आयआयएम ची स्थापना, महिलांकरीता निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण, १ कोटी घरांना सौर उपकरणांचे वितरण, १ कोटी गरीबांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज, लोकसंख्या नियंत्रण समिती स्थापन करणार, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरीता योजना, गरिबांसाठी २ कोटी घरे, तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्यमान योजनेचा लाभ, रेल्वे प्रवास सुखकर, ई-व्हेहिकल इकोसिस्टीम वाढविणार, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल आणणार, आदी अनेक सुधारणा या अर्थ संकल्पात दिसत आहे.

‘जय अनुसंधान’ हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा विश्वास आहे. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा मजबूत करणारा व युवकांना उद्यमशीलतेला – स्टार्टअप इनोवेशनला बळ देणारा ‘रोजगारदाता’ अर्थसंकल्प आहे, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)