सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरटा
राजुरा:- राजुरा शहरात ऐन बाजारपेठेत भरदिवसा चोरीचा थरार अनुभवायला मिळाला असून, राजुरा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष चन्ने यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून चोरट्याने तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या हाजी गुलाम हुसैन यांचे शबाब स्टील नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. संतोष चन्ने या दुकानात सोमवार, 5 फेब्रुवारी रोजी 11.30 वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने आले. दुचाकी उभी करून त्यांनी डीक्कीमधून आधी पाणी प्याले व त्यानंतर डीक्कीमधील प्लॅस्टिकच्या पिशवीतून नोटांचे एक बंडल काढून बाकीची रक्कम डीक्कीत ठेवून ते दुकानात गेले.
याचदरम्यान एक युवक दुचाकीजवळ येऊन उभा राहिला व त्याने कुठलीतरी वस्तू दुचाकीच्या ‘इग्निशन’मध्ये टाकून सराईतपणे डीक्की उघडली व आतील अडीच लाखांची रोकड असलेली प्लॅस्टिकची पिशवी अलगद काढून निघून गेला.
संतोष चन्ने घरी गेल्यावर त्यांनी पैसे काढण्यासाठी डीक्की उघडली असता त्यातील पैशांची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनतर त्यांनी तात्काळ शबाब स्टील येथे जाऊन तिथे असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या युवकाने केलेल्या चोरीचा संपूर्ण व्हिडिओ कैद झाला आहे. याबाबतची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत