पोटासाठी बंद खाणीतून कोळसा काढताना मृत्यू, ढिगाराच अंगावर कोसळला #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase

भद्रावती:- तालुक्यातील तेलवासा येशील बंद असलेल्या कोळसा खाणीतून विक्रीसाठी कोळसा काढत असताना ढिगाऱ्याखाली दबून एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. रवींद्र पाटील (४०) पिपरी देशमुख असे या मृत इसमाचे नाव आहे.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाताच घटनास्थळ गाठून मोठ्या प्रयत्नाने ढिगाऱ्याखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. 

कोळसा खाण बंद असून या खाणीतून अनेक बेरोजगार कोळसा काढून त्याची बाजारात विक्री करतात. रवींद्र पाटील हासुद्धा येथील कोळसा खाणीतून कोळसा काढून त्याची विक्री करीत होता. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो खाणीत गेला होता. कोळसा काढत असताना अचानक मातीचा ढिगारा त्याच्या अंगावर कोसळला. त्यात त्याचा दबून जागीच मृत्यू झाला.

या खाणीत कोळसा काढण्यासाठी अनेक बेरोजगार जात असतात त्यामुळे भविष्यातही अशा घटना घडू शकतात. त्यामुळे वेकोलिने खुल्या कोळसा खाणी बंद कराव्या, अशी मागणी तेलवासा ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश जुनघरे यांनी केली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व म्हातारी आई आहे.