चंद्रपूर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यासह बहुजन समाजाचा ओबीसी चेहरा डॉ.अशोक जीवतोडे यांच्या नावाची चर्चा भाजपाचे वर्तुळात आहे.
भाजपाकडून बहुजन ओबीसी चेहरा प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनीही पक्ष श्रेष्ठींनी विश्वासाने उमेदवारी दिली तर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळेच डॉ. जीवतोडे यांनी सर्वच आघाड्यांवर तयारी सुरू असून जनसंपर्क अभियान देखील सुरू केले आहे. जिवती, कोरपना पासून तर वणी, आर्णी या शेवटच्या टोकापर्यंत एससी, एसटी व मुस्लीम समाजाची गठ्ठा मते या मतदार संघात असली तरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी, बहुजनांची मते आहेत.
भाजपाला २०१९ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर भाजपा श्रेष्ठींना बहुजन उमेदवार द्यावा लागेल आणि मतदारांमध्येही हाच मतप्रवाह दिसून येत आहे. कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ. जीवतोडे चांदा शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेंटमुळे लोकांच्या थेट संपर्कात आहेत. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक जाळे पसरले आहे. स्वतंत्र विदर्भ आंदोलनात सक्रीय आहे.
माजी आमदार शिक्षण महर्षी श्रीहरी जीवतोडे गुरूजी यांचे ज्येष्ठ सुपूत्र असलेले डॉ. अशोक जीवतोडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून सक्रीय आहेत. धाकटे बंधू स्व. संजय जीवतोडे यांना जिल्हा परिषद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्षपदी विराजमान करण्यात डॉ.अशोक जीवतोडे यांची भूमिका महत्वाची होती. श्रेष्ठींनी उमेदवारी कुणालाही दिली तरी भाजप उमेदवाराच्या प्रचारात सक्रीय राहू असा दावा डॉ.जीवतोडे यांनी केला आहे. एकीकडे डॉ.जीवतोडे यांचासारखा ओबीसी बहुजन उमेदवार तर दुसरीकडे मुनगंटीवार व अहीर या आघाडीवर भाजप उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.