पक्षांतर्गत विरोधामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव गेला #chandrapurloksabha #chandrapur

Bhairav Diwase

बाळू धानोरकरांच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
चंद्रपूर:- काँग्रेस पक्षातलेच काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय, असा खळबळजनक आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

इतकच नाही तर आमच्या पक्षात भाजपच्या पेरोलवर चालणारे काही लोकं आहेत. भाजपवाले जे ऑर्डर देतात ते-ते ऑर्डर ते फॉलो करत असल्याचे देखील प्रतिभा धानोरकर म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून त्यांचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, या बाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नसली तरी अनेक चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी नाराज असून मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यामागे आमच्याच पक्षातील लोकांचा हात असून हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत असल्याचा गंभीर आरोप देखील प्रतिभा धानोरकर यांनी केलाय.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केला तरी पहिला हक्क माझा आहे. नुकतीच मी काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला याची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले आणि या संदर्भात मी सकारात्मक असल्याचे देखील त्यांनी मला सांगितले आहे. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. अद्याप कुठलीही यादी जाहीर झाली नसल्याने याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. मात्र काहीही झाले तरी मी काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार असल्याचा पुनरुच्चार देखील प्रतिभा धानोरकर यांनी बोलताना केला आहे.