Murder: नक्षल्यांनी केली एका व्यक्तीची हत्या #police #C-60 #gadchiroli #naxal

Bhairav Diwase

गडचिरोली:- पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली. अहेरी तालुक्यातील ताडगाव-दामरंचा रस्त्यावर आज (शुक्रवार) पहाटे ही घटना उघडकीस आली. अशोक तलांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ताडगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर अशोक तलांडेचा मृतदेह आढळून आला.


घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकले असून, अशोक तलांडे पोलिसांचा खबऱ्‍या असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. अशोक तलांडे हा मागील काही दिवसांपासून ताडगाव येथे वास्तव्य करीत होता. मोलमजुरी करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, नक्षल्यांनी आज त्याची हत्या केली. दरम्यान, अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

मागील आठवड्यात गडचिरोली पोलिसांनी ४ नक्षल्यांना ठार केले होते. त्यामुळे नक्षल्यांनी पोलिस खबरे असल्याच्या संशयावरुन सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना ही हत्या झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.