Social Media: चंद्रपूर प्रशासनाची सोशल मीडियावर करडी नजर #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
चंद्रपूर:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहिरातींचे प्रमाणीकरण, पेड न्यूज, फेक न्यूज, समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे कार्य जिल्हा माहिती कार्यालयाच्या मिडीया सेंटर येथून सुरू असून या सेंटरला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी मुकेशकुमार टांगले उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि सोशल मिडीयाच्या मॉनेटरिंगबाबत माहिती जाणून घेतली. तसेच सोशल मिडीयावर करण्यात येणा-या पोस्टबाबत अतिशय गांभिर्याने लक्ष ठेवावे, वृत्तपत्रात पेडन्यूज तसेच फेकन्यूज प्रकाशित झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. प्रमाणीकरणासाठी उमेदवारांचे अर्ज किती दिवसात निकाली काढल्या जातात, याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच फाईल्सची पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीचे कार्यपध्दती तसेच मिडीया सेंटर बाबत सामान्य निवडणूक निरीक्षकांना अवगत केले.